वस्त्रविश्व
🔶 वस्त्रविश्व🔶 एका विवाहसोहळ्याला गेले होते . उत्साहाला उधाण आलं होतं . कार्यालयाबाहेर अतिशय देखणा,सुंदर नक्षीकाम असलेला भला मोठा मंडप उभारला होता . बाजूंनी झुळझुळीत पडदे , जमिनीवर मऊमऊ गालिचा ... आत प्रवेश करतानाच प्रसन्न वाटत होतं . नवनवीन कपड्यातली पोरंपोरी मजेत हुंदडत होती . आईच्या हिटलरशाहीला बळी पडून , वाढत्या अंगाचे कपडे अडकवलेली बाळं , डायपरनं येणाऱ्या खाजेला वैतागत , डायपर ओढत दुडुदुडू धावत होती . घागरा , वनपीस , अनारकली अशा तऱ्हेतऱ्हेच्या आकर्षक कपड्यातल्या तरुणी उगीचच मुरकत इकडे तिकडे अधांतरी तरंगल्यासारख्या फिरत होत्या . “ अय्या ....कित्ती गं सुंदर ड्रेस ..! ए , मस्तचाय नै लाँग स्कर्ट ! ” अशी शेरेबाजीही चालली होती . सलवार कमीज , धोती कुर्ता , सुटबूट , कोट परिधान केलेल्या तरुणांचा घोळका तरुणींकडे कटाक्ष टाकत हास्यविनोद करत होता. पैठणी , पटोल्यापासून ते अलिकडच्या डिझाईनर साड्यांपर्यंत... तसंच , साड्यांच सूत , पोत , रंग , नक्षी , टिकाऊ आणि दिखाऊपणा , किंमत , कोणतं दुकान अधिक चांगलं यावर समस्त स्त्रीवर्गाचं रसभरीत चर्चासत्र मंगलाष्टकाच्या पार्श्वभूमीवर अधिकच रंगात आलं हो...