वस्त्रविश्व
🔶वस्त्रविश्व🔶
एका विवाहसोहळ्याला गेले होते . उत्साहाला उधाण आलं होतं . कार्यालयाबाहेर अतिशय देखणा,सुंदर नक्षीकाम असलेला भला मोठा मंडप उभारला होता . बाजूंनी झुळझुळीत पडदे , जमिनीवर मऊमऊ गालिचा ... आत प्रवेश करतानाच प्रसन्न वाटत होतं . नवनवीन कपड्यातली पोरंपोरी मजेत हुंदडत होती . आईच्या हिटलरशाहीला बळी पडून , वाढत्या अंगाचे कपडे अडकवलेली बाळं , डायपरनं येणाऱ्या खाजेला वैतागत , डायपर ओढत दुडुदुडू धावत होती . घागरा , वनपीस , अनारकली अशा तऱ्हेतऱ्हेच्या आकर्षक कपड्यातल्या तरुणी उगीचच मुरकत इकडे तिकडे अधांतरी तरंगल्यासारख्या फिरत होत्या . “ अय्या ....कित्ती गं सुंदर ड्रेस ..! ए , मस्तचाय नै लाँग स्कर्ट ! ” अशी शेरेबाजीही चालली होती . सलवार कमीज , धोती कुर्ता , सुटबूट , कोट परिधान केलेल्या तरुणांचा घोळका तरुणींकडे कटाक्ष टाकत हास्यविनोद करत होता. पैठणी , पटोल्यापासून ते अलिकडच्या डिझाईनर साड्यांपर्यंत... तसंच , साड्यांच सूत , पोत , रंग , नक्षी , टिकाऊ आणि दिखाऊपणा , किंमत , कोणतं दुकान अधिक चांगलं यावर समस्त स्त्रीवर्गाचं रसभरीत चर्चासत्र मंगलाष्टकाच्या पार्श्वभूमीवर अधिकच रंगात आलं होतं .
साड्यांच्या विश्वात भान हरपलेल्या स्त्रियांचा हात वधुवरांच्या डोक्यावर अक्षता वहाण्याऐवजी दुसरीच्या साडीचा पोत अजमावण्यात गुंतला होता . फेटे बांधलेल्या पुरुषांची ऐट काही निराळीच !! वधुवरांच्या कपड्यांबाबत सांगावं तेव्हढं कमीच ! अक्षता पडण्यापूर्वी , अक्षता पडल्यानंतर विधींसाठी, आप्तेष्टांच्या शुभेच्छा स्विकारताना , खास फोटोसाठी , जेवणाच्या पंगतीला आणि शेवटी मुलीच्या पाठवणीपर्यंत ... प्रत्येकवेळी वेगवेगळी आकर्षक वेषभूषा ! लग्नासाठी आलेल्या पैपाहुण्यांना त्याचं केव्हढं कौतुक !! वधुवरांकडील माणसांनी हौसेनं घातलेल्या पारंपरिक आणि आधुनिक वस्त्रप्रावरणाचं जेव्हढं कौतुक वाटत होतं तेव्हढंच इतर व्यावसायिक मंडळींचही कौतुक ! वाजंत्रीवाले , वाढपी , समारंभादरम्यान पाणी व काही स्नॅक्स देणारे , कामगार सगळेच विशिष्ट पोषाखात ! हे सगळं पाहतांना मीच त्या विविध वस्त्रांत लपेटली गेले आणि वस्त्र प्रावरणाचं समृद्ध जरतारी विश्व माझ्यासमोर साकारलं .
आयुष्याच्या प्रवासात कितीतरी प्रकारच्या वस्त्रांचा माणसाला कळत नकळत उपयोग होतो . वस्त्र ही माणसाची अन्नानंतरची मुलभूत गरज आहे . लंगोटीपासून कफनपर्यंत , घराच्या पुढच्या दारापासून मागच्या दारापर्यंत , अंथरूण पांघरुणापासून गालिच्यापर्यंत , गाड्यांपासून अंतराळयानापर्यंत , भूसंरक्षण , घर-रस्तेबांधणी , वैद्यकशास्त्र , औद्योगिक अशा अनेक क्षेत्रांत वस्त्रांनी माणसाला आपलंसं केलं आहे . साहित्य , संस्कृती , नृत्यनाट्य , अभिनय अगदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रांचं योगदान खूपच मोठं आहे . अनादी काळापासून ते आत्तापर्यंत वस्त्रांचा प्रवास थक्क करणारा आहे . सध्याच्या काळात अनेक कारणांसाठी वस्त्रांचा उपयोग केला जात आहे . माणसानं स्वतःच व्यक्तिमत्व आकर्षक आणि उठावदार दिसावं म्हणून वस्त्रांचा उपयोग मोठ्या कल्पकतेने करून घेतला आहे . वस्त्रे ही माणसाच्या शरीर संरक्षणाचं , लज्जा रक्षणाचं काम तर करतातच याशिवाय त्याला त्याचं व्यक्तिमत्त्व ही मिळवून देतात .
वस्त्रांच्या बाबतीत माणूस अतिशय चोखंदळ ! त्यामुळं एक नूर आदमी दस नूर कपडा ही त्याच्यासाठी योजिलेली म्हण अत्यंत योग्य आहे . माणसाला माणूस म्हणून घडवण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा म्हणजे वस्त्र . भारतात वस्त्र प्रावरणाच्या बाबतीत जेव्हढी विविधता आढळते तेव्हढी इतरत्र आढळते की नाही याची शंकाच वाटते . तसेच , साहित्यक्षेत्रात प्रतिमा रुपानं निर्माण झालेलं वस्त्रांचं स्थान ही अढळ आहे . आधुनिक वाल्मिकी गदिमांनी मानवी आयुष्यालाच जरतारी वस्त्राची उपमा देत एक अजरामर काव्य निर्माण केलं . एक धागा सुखाचा ..... अशा या बहुआयामी वस्त्रांचा समृद्ध प्रवास या सदरात मांडण्याचा हा प्रयत्न ! वस्त्रांचा अभ्यास करताना अनेकांचं मार्गदर्शन लाभलं . इचलकरंजी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे D.K.T.E. इंजिनियरिंग व टेक्सटाईल महाविद्यालय , त्यांचे समृद्ध ग्रंथालय व त्यांचा वस्त्रनिर्मितीमाहितीकोश , तेथील प्राध्यापक वर्ग , आपटे वाचन मंदिर , वस्त्रोद्योगातील तज्ञ मार्गदर्शक डॉ. चंद्रकांत काणे सर , पुणे येथील विश्रांती { वस्त्रसूक्त } दिवाळी अंक अशा अनेकांचे मार्गदर्शन लाभले . वस्तूसंग्रहालये , कापड व्यापारी , शिंपी यांच्या कडूनही भरपूर माहिती मिळाली . या सर्वांमुळेच वस्त्रांचे आडवे उभे धागे गुंफण्याचा , ते भरजरी विश्व उलगडण्याचा , हा प्रयत्न या सदरात केला आहे .
चित्कला कुलकर्णी - ९४२०४९३६१६
इचलकरंजी
Comments
Post a Comment