उर्ध्ववस्त्रे....उत्तरीय ते शेला🔶
वस्त्रविश्व
उर्ध्ववस्त्रे....उत्तरीय ते शेला
माणसाला उर्ध्ववस्त्रे परिधान करण्याची इच्छा का बरं झाली असेल? हो. नक्कीच आपण सांगू शकतो, शरीर संरक्षणासाठीच!!
प्राचीन काळापासून माणसाने उर्ध्ववस्त्रांचा अतिशय सुरेख असा वापर केला आहे. उत्तरीय, उपरणं, छाटी, शेला, शाल ही सारी उर्ध्ववस्त्रे. पूर्वीची उर्ध्ववस्त्रे ही रेशमी होती. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की पुरुषांपेक्षा बायकांनाच नटण्यामुरडण्याची अधिक हौस असते. पण हे काही खरे नाही हं! ही सारी उर्ध्ववस्त्रे शरीर संरक्षणासाठी तर वापरली जात असतच शिवाय ती स्वतःच्या अंगावर पांघरताना त्यामागे सौंदर्यदृष्टीही असे. यातूनच प्राचीन काळी पुरुषांनाही सुंदर दिसावं, रुबाबदार दिसावं असं नक्कीच वाटत असेल ना! कारण पवनार येथील राजा दशरथ विषाद आणि राम भरत भेट या शिल्पपट्टावर दशरथ आणि रामाच्या अंगावर जे उत्तरीय आहे ते अत्यंत कलात्मकरित्या परिधान केल्याचे दिसून येते. ते डाव्या खांद्यावरून डावी बाजू झाकून उजव्या हाताच्या खालून कमरेपर्यंत घेतले आहे.
अंगावर पांघरण्यात येणाऱ्या वस्त्रात उत्तरीयाचा उल्लेख ऋग्वेदातही आहे. प्राचीन काळी स्त्री पुरुषांची काही वस्त्रे समान होती. ती म्हणजे उपवसन आणि पर्याणहन. उपवसन म्हणजे वधूने परिधान केलेलं उत्तरीय. ऋग्वेदात वधूने परिधान केलेल्या आणि हवेमुळे फडफडणाऱ्या या वस्त्राचा उल्लेख आलेला आहे. पर्याणहन हे एक चादरीसारखे लांबरुंद पण वजनाने हलके वस्त्र. हे वस्त्र अंगावर लपेटून घेतले जाई. राजांच्या उत्तरीयाला ‘अधिवास’ असेही म्हणत. विवाह प्रसंगी वधूकन्या ‘प्रतिनिधी’ नावाचे पयोधरपट्ट [कंचुकीसारखे वापरले जाणारे वस्त्र] परिधान करत. राजेलोक जे रेशमी उत्तरीय परिधान करत त्यामागेही सौंदर्यदृष्टी असे. देवांच्या प्रतिमा पाहताना तर आपल्याला ते नक्कीच जाणवतं. खरंच, त्यांनी ते उत्तरीय किती कलात्मक पद्धतीनं घेतले आहे! हे उत्तरीय डाव्या खांद्यावरून घेऊन ते उजव्या काखेतून खाली सोडलेले आहे. आणि दुसरे टोक पाठीमागून उजव्या काखेतून घेऊन डाव्या खांद्यावरून मागे सोडलेले आहे. हडप्पा संस्कृतीतील शिल्पाच्या अंगावरही उत्तरीय दिसून येतं. प्राचीन काळी ग्रीक संस्कृतीत तेथील पोषाखात चिटॉन, हिमेशन आणि क्लॅमिज असे उत्तरीयांचे प्रकार आढळतात.
उपरणं हे देखील एक प्रकारचं उत्तरीय. ते खांद्यावरून पांघरले जाई किंवा गळ्यात अडकवले जात असे. सध्याच्या काळाचा विचार केला तर विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नेतेमंडळी गळ्यात आपआपल्या पक्षाचे चिन्ह असलेलं उपरणं अडकवून प्रचार करताना दिसतात. उपरणं हे धोतरापेक्षा लांबी-रूंदीने कमी असलेले वस्त्रं. काही काही उपरण्यांना नाजूकसा जरीकाठ देखील असतो. संन्यासी लोक उपरण्यासारखं जे वस्त्र वापरतात त्याला छाटी असेही म्हणतात. [शाटक वरून हा शब्द आला असावा, असं वाटतं.] छाटी म्हटलं की समर्थ रामदासस्वामी आणि त्यांचे शिष्य कल्याणस्वामी यांची आठवण येते. एकदा ते दोघे सज्जनगडावर कड्याशी उभे असताना वाऱ्याच्या झोताने रामदासस्वामींच्या अंगावरील छाटी उडून जाऊ लागते. “कल्याणा, छाटी उडाली रे..” असे समर्थ म्हणताच कल्याणस्वामी उडी घेऊन ती छाटी पकडतात आणि समर्थांना परत आणून देतात. आजही सज्जनगडावर ती जागा दाखवली जाते. अशी ही समर्थांची छाटी. लहान मुलांच्या अंगावर जे रेशमी ऊर्ध्ववस्त्र पांघरल जातं त्याला ‘पांबरी’ असंही म्हणतात. कालौघात हे वस्त्र आणि हा शब्द सुद्धा नामशेष होत चाललेला आहे.
या साऱ्या वस्त्रांबरोबरच आठवण येते ती शेल्याची. ‘शेला’ रामाने खास कबिरासाठी विणलेला. निसुगपणाचाही ‘शेला’! मृच्छकटिक नाटकामध्ये चारुदत्ताने वसंतसेनेकडे विसरलेला ‘शेला’. आणि लग्नाच्या वेळी वधूने अंगावर घ्यायचाही ‘शेला’. शेल्यामागं किती गोष्टी गुंफल्या गेल्या आहेत ना! शेला हे देखील उंची वस्त्रच. पूर्वीचे शेले रेशमी असायचे. त्यानंतर रेशीम आणि सूत या दोन्हीपासून विणलेले शेले आले. काही काही शेले भरजरीही असतात. श्रीमंत स्त्री पुरुष अंगावर शेला घेत असत. सौंदर्य खुलवण्यासाठी याचा अधिक वापर अजूनही होतो.
इंदिरा संताच्या कवितेतला ‘शेला’ हा धुक्याचा आहे. निर्मल, निरभ्र वातावरणात धूसर धूसर धुकं तरंगताना कवयित्री पाहते. त्या धुक्यावर सुवर्ण किरणांची सुंदर नक्षी तिला दिसते. ते पाहून तिला वाटतं, कुणी चारुदत्त वसुंधरेच्या अंगावर शेला फेकत आहे आणि आत्यंतिक प्रेमानं तिनं तो शेला हृदयाशी धरलेला आहे. एकीकडे निसर्गाचे विराट तरीही तरल असे रूप आणि आत्यंतिक प्रेम! अशा दोन्ही गोष्टी शेल्याच्या प्रतिमेतून साकारतात. त्या ओळी अशा-‘ थंड गुलाबी कार्तिकातला, हवाहवासा स्पर्श तयाचा, सुगंध त्याला नाजुक मादक, नव्या उमलत्या बूचफुलांचा, चारुदत्त हा कों कोठुनी, अंगावरती फेकित शेला, वसंतसेना वसुंधरेने, झेलुन तो हृदयाशी धरला!!’ असा हा सुंदर शेला!
आणि ज्ञानदेवांनी गुंफलेला शेला कशाचा? ‘मनाची गुंती’ ही ‘सुगंधाची गुंफण’ नेमकी कुठे झाली असावी? या अभंगात वेल, मोगरा, कळ्या हे सारे प्रतीक रूपाने आले आहेत. हा सुगंधी शेला निश्चितच मोगऱ्यांच्या फुलांचा किंवा कळ्यांचा आहे आणि तो विठ्ठलाला अर्पण केलेला आहे. खरंच असा अर्थ असेल का? मग, ‘मनाचिये गुंती गुंफियेला शेला’ असं म्हणताना व्यावहारिक जीवनातील तऱ्हेतऱ्हेच्या विचारांचा शेला गुंफला गेला असेल? शेला कोणताही असो, तो विठ्ठलालाच अर्पण केलेला आहे. त्यामुळे योगक्षेम पाहणारा तोच आहे हे मात्र नक्कीच खरे!
चित्कला कुलकर्णी-९५११२०३८२७
चित्कला कुलकर्णी-९५११२०३८२७
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#शारदियेचिचित्कला
#शारदियेचिचित्कला

Comments
Post a Comment